माणूस ज्या ठिकाणी जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो त्या जागेशी आपसूकच त्याची नाळ जुळते आणि ते जर ’गिरगांव’ असेल तर संपूर्ण जन्मात अगणिक वेळा देवाचे आभार मानल्याशिवाय मन रहात नाही. ’गिरगांवकर’ असण्याचा मान आहेच तेवढा मोठा!
’गिरी’ म्हणजेच पर्वताच्या, मलबार हिलच्या पायथ्याशी वसलेलं एक गाव म्हणून त्याचं नाव ’गिरगांव’. इथे म्हणे पूर्वी शेतं होती, कुरणं होती आणि त्यात इंग्रजांची गुरं चरायला यायची, म्हणून ’चर्नीरोड’ असं इथल्या स्टेशनचं नाव पडलं. इथल्या वाडयांची नावं कदाचित म्हणूनच फणसवाडी, आंबेवाडी, केळेवाडी अशी असावीत. शिवाय खेतवाडी आणि खोताची वाडी आहेतच. त्यामुळे हा इतिहास बर्याच अंशी खरा असावा. गिरगांवाच्या भूगोलाबाबत मात्र अनेक वाद आहेत. गिरगांव नक्की कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं याबाबत पालिकेचा नकाशा वेगळं सांगतो, गुगलमॆप वेगळं सांगतो तर जुने जाणकार वेगळंच सांगतात तरी ढोबळमानाने प्रिन्सेस स्ट्रीट पासून शास्त्रीहॊल मधील नानांच्या वाडयापर्यंत आणि गिरगांव चॊपाटीपासून थेट खेतवाडी पर्यंत गिरगांव मानला जातो.
गिरगांवात पहाटे ५ च्या सुमारास पाणी येतं त्यामुळे लवकर उठण्याची सवय गिरगांवकरांना आपसूकच लागते. अगदी पहाटे कुठेही जायचं असलं तरी यामुळेच असुरक्षितता जाणवत नाही कारण प्रत्येक घरात एक तरी माणूस जागा आहे याची खात्री असते. पहाटे लवकर उठून गिरगांव चॊपाटीवर एक चक्कर मारायला किंवा कॆवल्यधाम मध्ये योगसाधना करायला अनेक जण जातात. येताना नाक्या-नाक्यावर घरगुती शिरा-पोहे-उपम्याचे स्टॊल्स, वसईचे भाजीवाले, इराण्याकडचा ब्रुन मस्का आणि चहा असं बरंच काही वाट पहात असतं. गिरगांवची सकाळ आजही वासुदेवाच्या चिपळ्यांच्या आवाजाने आणि अभंगांनी होते. ऒफिसला जायच्या घाईतही निघता निघता शेजार्यांना एक हाक मारून निघायचं हा जणू पायंडाच आहे. घरी आल्यावर थोडं फ्रेश होऊन, मग बाईक काढून राऊंड मारायला जायचं आणि एका ठराविक नाक्यावर किंवा कटट्यावर मस्त ग्रुप जमवून गप्पा टाकायच्या, हे इथल्या तरूणांचं फेव्हरिट रूटिन आहे. रविवारी क्रिकेटला पर्यायच नाही. एखादा महत्त्वाचा सामना जर टि.व्ही.वर चालला असेल तर कुणाच्यातरी घरात सगळ्यांनी एकत्र येऊन तो पहाण्याची मजा काही ऒरच! एखाद्याच्या अडचणीच्या वेळी अगदी न बोलवताही धावून जाणं ही गिरगांवकरांची खासियतच आहे.
सण काय असतो हे अनुभवायचं असेल तर गिरगांवला पर्याय नाही. गणेशोत्सवात इथे वेगळेच वारे वहात असतात. मोठ-मोठ्या गणेशमूर्त्या, देखावे, चलच्चित्र यांची जणू स्पर्धाच लागलेली असते, तरी सगळी गणेशमंडळं एकमेकांची मदतही करत असतात. चाळीत एकाकडचा गणपती म्हणजे तमाम चाळकर्यांच्याही घरचा गणपती असतो. गिरगांवचा राजा आणि महाराजा यांची विसर्जनाची मिरवणूक तर बघण्यासारखी असते. गुजरात्यांचं प्रमाण गिरगावात आता बर्यापॆकी वाढलंय, त्यामुळे नवरात्रीचा थाटही असतो पण त्यातही भोंडला, हळदीकुंकू समारंभ, भजन-किर्तनाचे कार्यक्रम असे मराठमोळे प्रकार असतातच. गुढीपाडव्याला तर गिरगांवाची द्रुष्ट काढून टाकावीशी वाटते. सारख्याच केशरी गुढ्यांनी सजलेल्या चाळी, नथ आणि नऊवारी साड्यांमधल्या बायका, एरवी कितीही ’कूल’ असल्याच्या थाटात असले तरी गुढिपाडव्याच्या दिवशी सदरा आणि फेटा घालून मिरवणारी तरूणाई, विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत निघालेली भव्य मिरवणूक, त्यातलं ध्वजपथक, लेझीम पथक, नऊवारी नेसून बाईक चालवणार्या मॊर्डन जिजाऊंचं पथक सारंच अप्रतिम असतं. दिवाळीत तर प्रत्येक घरात पाहुणे असतात. संपूर्ण गिरगांव रोषणाईने झळाळून निघालेलं असतं. ह्या मोठ्या सणांसोबतच तुळशीचं लग्न, मंगळागॊरी, मकरसंक्रांतीचं हळदीकुंकू, शिवजयंती, कोजागिरी पॊर्णिमा असे छोटे मोठे समारंभ सुरूच असतात.
गिरगांव म्हणजे संस्कार, गिरगांव म्हणजे दर पन्नास पावलांवर हात जोडायला लावणारी मंदिरं, गिरगांव म्हणजे भक्तिभावाने गाईला चारा खाऊ घालण्याची लहानपणापासूनच लावलेली सवय, गिरगांव म्हणजे साहित्य संघातली नाटकं आणि गाण्यांचे कार्यक्रम, गिरगांव म्हणजे पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा इतिहास सांगणार्या मॆजेस्टिक थिएटरचा अभिमान, गिरगांव म्हणजे कुटुंबसखी मधली स्त्री शक्ती, गिरगांव म्हणजे शेजारच्यांच्या मुलाला सिगरेट ओढताना पाहिल्यावर हक्काने त्याचे कान धरणं, गिरगांव म्हणजे टेंभेंची मिसळ आणि तांबेंकडचा खरवस, गिरगांव म्हणजे नाक्यावरचा वडापाव आणि टपरीवरचा कटिंग चहा, गिरगांव म्हणजे शारदाश्रम, कमळाबाई सारख्या जुन्या मराठी शाळा, गिरगांव म्हणजे मुंबई मराठी ग्रंथालय आणि स.का.पाटील उद्यानातली अभ्यासवाटिका, गिरगांव म्हणजे मुंबईभरातल्या लोकांसाठी लग्नाची पत्रिका छापण्याचं हक्काचं ठिकाण, गिरगांव म्हणजे दिवाळी अंकांचं श्रद्धास्थान, गिरगांव म्हणजे जुन्या-नव्या कलाकारांची मांदियाळी, गिरगांव म्हणजे ऒपरा हाऊसच्या वास्तूचे अवशेष, .. गिरगांव म्हणजे कॊलांवरून ओघळणारे पावसाचे थेंब, गिरगांव म्हणजे एकटंच कधीतरी सी-फेस वर बसून समुद्राशी मारलेल्या निवांत गप्पा..गिरगांव म्हणजे आणखी बरंच काही..इतकं की शब्दांमध्ये मावणं शक्यच नाही.
जन्मस्थळ आणि राहत्या ठिकाणाबाबत वाटते तेवढी आत्मीयता गिरगांवाबद्दल लहानपणापासून होती. पण बांद्रा फेस्टिवल, काळाघोडा फेस्टिवलच्या धर्तीवर ’गिरगांव फेस्टिवल’ करण्याची कल्पना सुचली, तिला मूर्त स्वरूप आलं आणि ती पार पडली तेव्हा गिरगांवाबद्दलचं हेच ’वाटणं’ खूप वेगळं होतं. त्यात नुसताच अभिमान नव्हता तर जबाबदारीची जाणीव होती. एवढया थोर परंपरेचे, इतिहासाचे, संस्क्रुतीचे आपण पाईक आहोत ही भावनाच भारावून टाकणारी होती. या फेस्टिवलच्या निमित्ताने आम्ही जवळजवळ सारख्याच वयाची अनेक तरूण गिरगांवकर मंडळी एकत्र आलो. काही ओळखीची होती तर काही नवीन ओळखी झाल्या. इथली घरं सोडून उपनगरात रहायला गेलेल्यांपॆकीही काही जण यात सहभागी झाले (कारण वन्स अ गिरगांवकर ऒलवेज अ गिरगांवकर) . प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या स्थरावर कार्यरत होतं. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी, घरची परिस्थिती वेगळी, कामाची वेळ वेगळी तरी एक धागा आम्हा सर्वांना शेवटपर्यंत बांधून ठेवत राहिला, तो म्हणजे ’गिरगांव’. प्रत्येकाच्या गिरगांवाबद्दल अनेक कहाण्या आहेत मग कामं करून कंटाळा आला की अशा गप्पांचा फड गिरगांवच्या कटट्यावर जमायचा. आमची अर्ध्याहून जास्त कामं या कटट्यावरंच झाली. या फेस्टिवल मध्ये कुणाचाच एका पॆशाचा आर्थिक फायदा नव्हता(वेळप्रसंगी पदरचेच पॆसे गेलेत!) पण आज आम्ही सगळे २०० टक्के गिरगांवकर आहोत. ’फेस्टिवलवाले’ म्हणून अख्ख्या गिरगांवात ओळख आहे. गिरगांवातल्या प्रत्येक वाडीत, प्रत्येक गल्लीत एक तरी ओळखीचा माणूस आहे आणि ’तुम्ही पुढाकार घेतलात म्हणून झालं हो!’ असं म्हणून कॊतुक करणार्या थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आहेत.
या फेस्टिवल दरम्यान गिरगांवाबद्दल अनेक नवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. थेट प्रभाकर पणशीकर, सुलोचना चव्हाण, सुमती टिकेकरांपासून स्वप्निल जोशी, प्रदिप पटवर्धन, श्रीरंग गोडबोले, नारायण जाधव अशा अनेक लहान-मोठ्या व्यक्तिंशी ’गिरगांव’ या विषयावर भरपूर गप्पा मारता आल्या. त्यावेळी एक गोष्ट मात्र लक्षात आली की गिरगांवाबद्दल बोलताना त्यांच्या आणि आमच्या चेहर्यांवर सारखीच चमक होती आणि तेच स्मित होतं.
गिरगांवाने अनेकांना भरभरून दिलंय आणि हेच गिरगांव त्याची सगळी मूल्यं आणि परंपरा सोबत घेऊन कात टाकतंय. चाळींची जागा उत्तुंग टॊवर्स घेतायत. इराण्याकडच्या अडड्याची जागा सायबर कॆफे ने घेतलीए. क्रिकेट सामन्यांसोबतच फूटबॊल मॆचेस पाहणार्यांची संख्या वाढलीए. पूर्वी नाक्यावर गप्पा व्हायच्या आता ऒनलाईन चॆट मध्येच हाय हॆल्लो होतंय. एकाच वाडीत राहूनही कधीतरी रस्त्यात भेटून गप्पा होतात, पण आता कुणाच्या घरी जाऊन गप्पा ठोकत बसायला ग्रुहिणींनाही वेळ नाही, टि.व्ही.वरच्या मालिका असतात ना! इंग्रजीतून शिक्षण घेणार्यांचं प्रमाण वाढल्याने मराठी शाळा मात्र शेवटच्या घटका मोजतायत. रहाणीमान सुधारलंय. टिपीकल मिडलक्लास रहाणीमानातून आणि विचारसरणीतूनही गिरगांवकर बाहेर पडलाय. टू व्हिलर ते फोर व्हिलरचा प्रवास त्याने सहज साध्य केलाय. इथल्या तरूणांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. मॊडलिंगपासून पायलट आणि आयटीपासून हॊटेल मॆनेगमेण्ट पर्यंत नवनवीन क्षेत्रांत भरारी मारण्यासाठी त्यांनी आपल्या कक्षा रूंदावल्यात. प्रत्येक चार घरांमागे एक मुलगा किंवा मुलगी परदेशात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेली आढळते. आजचा गिरगांवकर हायटेक आहे. त्याला नव्याची आस आहे. त्याच्या वडिलोपार्जित चाळींच्या पुनर्विकासाबाबतही तो चोखंदळ आहे. कुणीही सोम्यागोम्या येऊन त्याला आता फसवू शकत नाही.
गिरगांव बदलतंय पण त्याची मूळ स्वभाववॆशिष्ट्य कधीच बदलणार नाहीत. चाळीतल्या खोल्यांमधून टॊवरमध्ये रहायला गेलेल्यांमध्ये आजही गणेशोत्सवात तोच उत्साह दिसतो. मॆकडोनल्ड्स कितीही जवळ आलं आणि खिशाला परवडलं तरी कुटुंबसखीकडचे कांदे पोहे, पुरणपोळी, तांबे आणि कोल्हापुरी चिवडेवाल्याकडचे उकडीचे मोदक, साण्डूकडचा साबूदाणा वडा ह्या चवी गिरगांवकरांच्या जिभेवरून ढळणं कधीही शक्य नाही. पार्टीज, डिस्कोजचं कल्चर झपाट्याने लोकप्रिय होत असलं तरी कामावरून दमून घरी आल्यावर प्रसंगी सुट्टी टाकून गुढीपाडव्याच्या मिरवणूकीची तयारी करण्यासाठी कुणीही मागे रहात नाही. मोठ्यांना वाकून नमस्कार करायला आम्हाला सांगावं लागत नाही, ते संस्कार आपोआपच झालेत. असं मजेत म्हटलं जातं की ’यु कॆन टेक गिरगांवकर आऊट ऒफ गिरगांव बट यु कॆन नेव्हर टेक गिरगांव आऊट ऒफ गिरगांवकर’ आणि हे अत्यंत खरं आहे. आमचं गिरगांव झपाट्याने पुढारतंय आणि त्याच्या बदलांचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय ही खूप मोठी गोष्ट आहे. गिरगांवात आमची खूप मोठी भावनिक गुंतवणूक आहे आणि उद्या जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ती कायम रहाणार, यात वादच नाही.

